नांदेड(प्रतिनिधी)-ऑगस्टमध्ये स्थानिक गुन्हा शाखेतून बदलीवर सोडण्यात आलेल्या तीन जणांचे वेतन काढतांना दोन जणांचे वेतन स्थानिक गुन्हा शाखेतून आणि एकाचे देगलूर पोलीस ठाण्यातून काढण्यात आले आहे. त्यानंतर मात्र ऑक्टोबरचे वेतन तीनही जणांचे दहशतवाद विरोधी पथकातून काढण्यात आले आहे. यातील देगलूर येथून सप्टेंबरचा वेतन घेणारे पोलीस अंमलदार हे मागील पाच वर्षापासून काम स्थानिक गुन्हा शाखेत आणि वेतन देगलूर पोलीस ठाण्यातून घेत आहेत आणि त्या अगोदर त्यांची नियमित नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत होती.
स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेले पोलीस अंमलदार तानाजी मारोती येळगे बकल नंबर 1601, मोतीराम लिंगू पवार बकल नंबर 3160, देविदास ढवाजी चव्हाण बकल नंबर 2675 यांना 8 सप्टेंबर 2024 रोजी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतून बदलीवर सोडण्यात आले. या तिघांसोबत पोलीस अंमलदार संभाजी अंबाजी मुंडे बकल नंबर 2516 यांना स्थानिक गुन्हा शाखेतून दहशतवाद विरोधी पथकात जाण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. याशिवाय इतर चार जणांना त्याच दिवशी, त्याच नोंद क्रमांकानुसार, पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आले.
या चार जणांपैकी पोलीस अंमलदार संभाजी अंबाजी मुंडे बकल नंबर 2516 हे दहशतवाद विरोधी पथकात 9 सप्टेंबर 2024 पासून काम करत आहेत. पण तानाजी येळगे, मोतीराम पवार, देविदास चव्हाण हे मात्र बदलीवर कार्यमुक्त केल्यानंतर सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत होते. त्यामुळे सप्टेंबर 2024 चे पवार, चव्हाणचे वेतन नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतूनच काढण्यात आले. तसेच तानाजी येळगेचे वेतन पोलीस ठाणे देगलूरने निर्गमित केलेले आहे. म्हणजे तो पर्यंत तरी त्यांना स्थानिक गुन्हा शाखेतून मुक्त केले जरूर पण ते काम तेथेच करत होते. यांच्यासोबत बदली झालेले पोलीस अंमलदार संभाजी मुंडे यांचे वेतन मात्र दहशतवाद विरोधी पथकातून निघाले आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2024 चे वेतन काढतांना येळगे, पवार, चव्हाण आणि मुंडे या सर्वांचे दहशतवाद विरोधी पथकातूनच निघाले आहे.
तानाजी येळगेचे मासिक वेतन मागील अनेक वर्षापासून देगलूर पोलीस ठाण्यातूनच काढले जात आहे. पण त्यांनी कधी देगलूर पोलीस ठाणे पाहिले हे सांगता येणार नाही. त्या अगोदर मात्र ते स्थानिक गुन्हा शाखेत नियमित नियुक्तीत होते. म्हणजे लोकांना दाखविण्यासाठी, कागदोपत्री अभिलेख राहावा म्हणून पोलीस विभागात काही लोकांच्या बदल्या केल्या जातात आणि काम ते आपल्या आवडत्या जागी करतात. किंवा त्यांचे आवडते साहेब त्यांना आपल्या सोबत काम करायला लावतात. सर्वसामान्य माणसाच्या हाताने एका खात्यातील रक्कम त्यांच्याच दुसऱ्या खात्यात वर्ग करतांना अभिलेख पुर्ण ठेवला नाही तर ती शासनाची फसवणूक होते.पण यांच्यावर मात्र काही कार्यवाही होत नाही. त्यासाठी एक ठरलेले उत्तर दिले जाते. ज्यानुसार साहेबांच्या तोंडी आदेशाने असे सुरू असल्याचे ते सांगतात. पोलीस अधिकार व पोलीस अंमलदार यांना सलग्न करण्यात येवू नये असे पोलीस महासंचालक कार्यालयाचे पत्र क्रमांक 218/2024 मध्ये नमुद आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि.24 फेबु्रवारी 2024 च्या परिपत्रकानुसार वरिष्ठांकडून मौखिक (तोंडी) आदेश मिळाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर त्यास लेखी पुष्ठी मिळवावी लागेल आणि अशी लेखी पुष्ठी देणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल या दोन्ही पत्रांना काळीमा फासून अशा प्रकारे तोंडी काम सुरू आहे. यावर कार्यवाही कोण करेल याबद्दलही काही आज म्हणता येणार नाही.म्हणूनच म्हणतात ना पोलीस खाते करील तेच होईल.
Post Views: 64