नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोगलगाव शिवारात एका 40 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा खून झाला आहे. या व्यक्तीने पेहराव केलेल्या शर्टवर एस.टेलर चाकण एमआयडीसी असे शब्द लिहिलेले आहेत. रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मदत करावी.
दि.2 नोव्हेंबरच्या दुपारी 12 वाजेच्यापुर्वी कधी तरी हा प्रकार घडला आहे. मौजे गोगलगाव शिवारातील पाझर तलावाजवळ ता.बिलोली येथे एक अज्ञात 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्याच्या पोटावर, पाठीवर, कंबरेवर, चेहऱ्यावर, हातांवर तिक्ष्ण हत्याराने हल्ला केलेला दिसत होता. त्यावरून रामतिर्थ पोलीस उपनिरिक्षक शिवराज निवृत्ती नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मयत व्यक्तीला मारणाऱ्या अज्ञात लोकांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 प्रमाणे गुन्हा क्रमांक 275ं/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप हे करीत आहेत.
आज श्रीधर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खून झालेल्या 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीच्या शरिरावर लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. त्यावर एस.टेलर, एमआयडीसी चाकण असे लिहिलेले आहे. नांदेड जिल्ह्यातील बरीच मंडळी चाकण एमआयडीमध्ये काम करतात. म्हणून हा मरण पावलेला अनोळखी व्यक्ती नांदेड जिल्ह्याचा असेल असा अंदाज आहे. जगताप यांनी आपले पोलीस अंमलदार चाकण येथे पण पाठविले आहेत. तसेच त्यांनी जनतेला आवाहन सुध्दा केले आहे की, आपल्या घरातील कोणी व्यक्ती गायब असेल, आसपासच्या घरातील कोणी व्यक्ती गायब असेल त्या लोकांनी पोलीस ठाणे रामतिर्थ येथे संपर्क साधावा. तसेच या अनोळखी खून झालेल्या व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असेल तर त्यांनी थेट माझ्याशी मोबाईल क्रमांक 8007997900 यावर संपर्क साधून माहिती द्यावी.
Post Views: 155