नांदेड(प्रतिनिधी)-मौजे टाकळगाव ता.नायगाव शिवारातील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धाड टाकली. परंतू पोलीसांपेक्षा 2 नंबरचे काम करणारे व्यवसायीक पुढे असतात हे यावेळी दिसून आले. तरीपण या ठिकाणी 12 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून रोख 1 लाख 60 हजार 620 रुपयांसह एकूण 2 लाख 33 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप स्वत: कुंटूर पोलीस ठाण्यात जाऊन बसले होते. कारण हद्द कोणाची आणि गुुन्हा कोणी दाखल करावा यावर मत-मतांतर होते.
पोलीस उपमहानिरिक्षकांच्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर देविदास मठवाड जे सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिवाळीनंतरच्या दुसऱ्या रात्री 2 नोंव्हेंबर रोजी ते आणि त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार नलबे, मांजरमकर, कलंदर, जाधव, निर्मले, राठोड, भाले, विलास धुमाळ, गवळी, सुरेश श्रीरामे आणि निरणे असे पोलीस पथक दोन चार चाकी वाहनांमध्ये हॉटेल पंचवटी, नायगाव जवळ त्यांना माहिती मिळाली की, मौैजे टाकळगाव शिवारात शेख समीर यांच्या शेतात जुगार अड्डा सुरू आहे. त्या ठिकाणी एक टिनशेडमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता. पोलीस पथक तेथे पोहचताच, पोलीसांचा सुगावा लागताच बरीच मंडळी पळून गेली. तरी पण पोलीसांनी संजय शंकर बानेवाड, शेख कदीर शेख दस्तगिर, ओम बालाजी बाणेवाड, शेख समीर शेख दस्तगिर, रा.घुंगराळा ता.नायगाव, शेख गौस शेख हारुनसाब, मंगेश दत्तात्रय कपाळे, शिवाजी बापूराव ससाणे रा.देगलूर, बाबु बळी गजेवाड, कोंडीबा माधव भंडरवार रा.बरबडा ता.नायगाव,अविनाश उत्तमराव पाळेकर रा.नायगाव, सुनिल गोविंद पवार रा.कुंटूर तांडा, नागेश देवराव जाधव रा.कृष्णूर ता.नायगाव, राजेश सोपान भोईवाड रा.नरसी ता.नायगाव असे 12 जण पोलीसांच्या ताब्यात आले आणि एक फरार आरोपी शेख नदीम हा पळून गेला. पकडलेल्या लोकांकडून मोबाईल फोन 12, 1 लाख 60 हजार रुपयांचे, एक दुचाकी गाडी 60 हजार रुपयांची, भारतीय रुपयांमधील चलन 1 लाख 13 हजार 620 रुपये असा एकूण 2 लाख 33 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नायगाव पोलीसांनी सर्व जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शहाजी उमाप आले
प्राप्त झालेल्या माहितीनुसार जुगार अड्डा कोणाच्या हद्दीत आहे म्हणजे पोलीस ठाणे कुंटूर की, पोलीस ठाणे नायगाव यावर बरीच मत-मतांतरे झाली. तेंव्हा पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप स्वत: कुंटूर पोलीस ठाण्यात येवून बसले आणि नंतर या गुन्ह्याचे घटनास्थळ सुनिश्चित झाले आणि नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस पथक येत आहे काय? यावर निगराणी करण्यासाठी अनेक निरिक्षक लावण्यात आले होते.काही जण झाडावर, काही जण रस्त्यांच्या कडेला आणि एक त्या टिनशेडवर उभा होता. म्हणजे पोलीसांपेक्षा पुढचे पाऊल तयार ठेवून हा जुगार अड्डा सुरू होता. हा जुगार अड्डा मोठ्या स्वरुपात होता. मात्र जुगार चालकांच्या निगराणीमुळे बरेच जुगार अंधारात पळून गेले. अशाच प्रकारे आजही अनेक जुगार अड्डे सुरू आहेत. नांदेड शहराच्या गोदावरी नदीच्या पलिकडे तर हे अड्डे जास्त जोमात सुरू आहेत.
Post Views: 572