नांदेड(प्रतिनिधी)-बलिप्रतिपदेच्या दिवशी गागलेगाव पाझर तलावाजवळ सापडलेल्या अनोळखी मयत व्यक्तीची ओळख पटवून त्याचा खून कोणी केला. त्याला जेरबंद करण्याची उत्कृष्ट कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे.
दि.2 नोव्हेंबर 2024 रोजी रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गागलेगाव शिवारात एका 40 वर्षीय व्यक्तीचे प्रेत सापडले. त्या व्यक्तीला कोणी ओळखत नव्हते, त्याच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने केलेल्या बऱ्याच जखमा होत्या. या संदर्भाने रामतिर्थ येथील पोलीसांनी दिलेल्या तक्रारीवरुन खून या सदरात गुन्हा क्रमांक 275/2024 दाखल झाला. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेला जिल्ह्यात घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय आणि त्यांच्या विभागातील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, गणेश लोसरवार, बालाजी यादगिरवाड, राहुल लाठकर, मारोती मोरे, सुधाकर देवकत्ते, भिमराव लोणे आणि मारोती मुंडे हे गागलेगावच्या पाझर तलावाजवळ गेले आणि तेथील परिस्थितीची पाहणी करून उदय खंडेराय यांनी या खूनातील अनोळखी मयताचा शोध लावणे आणि त्याचा मारेकरी शोधणे अशी दुहेरी जबाबदारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांना दिली.
मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी मरणारा व्यक्ती विठ्ठल दत्ता पातेवार(30) रा.पिंपळगाव ता.नायगाव जि.नांदेड असा असल्याचे शोधले. पिंपळगाव येथील ईस्माईल खाजा मियॉं कुरेशी (35) या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद होता. याचा शोध लावला आणि त्यानंतर ईस्माईल कुरेशीला ताब्यात घेवून चौकशी केली तेंव्हा ईस्माईल कुरेशीने विठ्ठल पातेवारचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या अहवालावरून ईस्माईल खाजा मियॉं कुरेशीला पुढील तपासासाठी रामतिर्थ पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांनी स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांचे कौतुक केले आहे.
Post Views: 79