नांदेड(प्रतिनिधी)- काल-परवा विदर्भात एका निर्जन ठिकाणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियातून येणाऱ्या नोटांवर लावण्यात येतात ते पांढऱ्या रंगांचे लाखो रॅपर सापडले आहेत. एका बंडलमध्ये 5 कोटी रुपयांच्या नोटा असतात म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचे महत्व समोर आले आहे.
विधानसभा निवडणुक जाहीर होण्यापुर्वी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण, लाडका भाऊ, भांडी-कुंडी, ज्येष्ठांना तिर्थ यात्रा अशा अनेक योजना जाहीर करून शासनाच्या पैशांची केलेली उधळपट्टी जवळपास 1 लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे राज्याच्या खजिन्याची अवस्था अशी आहे की, निवडणुक संपताच द्यावे लागणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुध्दा कर्ज घ्यावे लागेल. सरकार कोणाचेही आले तरी पण अवस्था हीच आहे.
यानंतर सध्या निवडणुक मतदानाचा दिवस येण्यासाठी 9 दिवस शिल्लक आहेत. याहीपेक्षा निवडणुक प्रचार संपल्यानंतरचे 48 तास जास्त महत्वाचे असतात आणि त्यासाठी वेगळ्या नोटांची सोय झाल्याचा पुरावा विदर्भात सापडला. निवडणुक आयोगाने आम्ही एवढे कोटी रुपये पकडले असे प्रसिध्दी पत्रक जारी केले. परंतू ते पैसे कोणाचे होते, कोेठुन आले होते, कोठे जाणार होते याचा काही थांगपत्ता निवडणुक आयोगाला लागलेला नाही. यापुर्वी पासून आजपर्यंत असा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही. म्हणजे या निवडणुकीमध्ये नोटांचा पाऊस पडेल असे म्हटले तर चुक ठरणार नाही. सापडलेल्या कागदांच्या वेस्टनांचा हिशोब केला तर ती रक्कम सुध्दा शेकडो कोटींमध्ये होत आहे. ते कागदाचे वेस्टन निर्जन ठिकाणी का टाकले. जाळून टाकले असते तर काही पुरावा तर भेटला नसता. ज्या ठिकाणी हे वेस्टन सापडले आहेत. तेथे आसपास कोणतेही कोषागार नाही. बॅंक नाही, पतसंस्था नाही मग हे कागदाचे वेस्टन आले कसे? याबद्दल असे सांगितले जात आहे की, अत्यंत सुनियोजित पध्दतीने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रशासनाप्रमाणे या नोटा कागदाच्या पॉकीटात टाकल्या जाणार आहेत आणि त्या मतदारांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत.
आजपर्यंत आम्ही 8 निवडणुकांमध्ये मतदान केले आहे, 6 निवडणुकांच्या प्रक्रियेचे वृत्तांकन पण केले आहे. पण यंदा दिसणाऱ्या निवडणुक प्रक्रियेमध्ये समोर येत असलेली अवस्था ही अत्यंत वाईट आहे. एवढ्या खालच्या स्तरावर निवडणुकीचा प्रचार आम्ही कधी पाहिला नाही. कोठे चालली आहे लोकशाही? हा प्रश्न जेंव्हा मनात येतो तेंव्हा लोकशाहीच्या व्याख्येचा अर्थात लोकांकडून लोकांसाठी लोकांनी चालविलेली सत्ता म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची व्याख्या तयार करणाऱ्या अब्राहम लिंकन तिथे स्वर्गात सुध्दा किती वाईट वाटत असेल. म्हणूनच म्हणतात की सध्या कलयुग सुरू आहे.
मतदार सुध्दा एवढे हुशार झाले आहेत की, प्रत्येक उमेदवारांकडून ते पैसे घेत आहेत. म्हणूनच आम्ही या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार आहे असे लिहिले आहे. पण मतदान देतांना तर मतदारांना एकच पर्याय आहे. त्यामुळे सगळ्यांचे पैसे घेवून मतदान एकालाच करायचे आहे. आमच्या मते तो उमेदवार मतदारांनी उत्कृष्टपणे निवडावा. जेणे करून पैशांचा पाऊस पाडण्याचा हा यंदाच्या निवडणुकीतील प्रकार पुढे तरी नेते मंडळी करणार नाहीत.
Post Views: 4