नांदेड(प्रतिनिधी)-22 ऑक्टोबर रोजी एका भिकाऱ्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्या संदर्भाने वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला होता. पण वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्या संदर्भाचा खूनाचा गुन्हा दाखल झाला. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी दोन मारेकऱ्यांना आज ताब्यात घेतले आहे.
दि.22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास गुरुद्वारा नगीनाघाटच्या शेजारी असलेल्या शौचालयाच्या वरांड्यात एक मृतदेह सापडला. मयताचे नाव कलमराज थापा असे होते. तो भिक मागुन आपले जीवन व्यतित करीत होता. त्यावेळी वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले यांनी केला. या प्रकरणात वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मयताचा गळा दाबलेला होता, त्याला अंतर्गत बरेच मार होते. त्या आधारावर वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले आणि इतर पोलीसांनी काढलेल्या माहितीनुसार मरण पावलेला कलमराज थापाला राजेश केसी उर्फ आर.के.आणि हरी थापा या दोघांनी गळा दाबून खून केला आहे अशी तक्रार दिली. त्यानुसार वजिराबाद पोलीसांनी राजेश केसी आणि हरी थापाविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1),118(1), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 552/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कलमराज थापाचा खून करणाऱ्या राजेश केसी व हरी थापा या दोन मारेकऱ्यांना वजिराबाद पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
Post Views: 366